नवी दिल्ली – भारतात सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लसीच्या मंजुरीचा प्रस्ताव अमेरिकेची औषध कंपनी जॉनसन अँड जॉनसनने ठेवला आहे. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. या लसीला सरकारने मंजुरी दिल्यास भारतात कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी चौथी लस उपलब्ध होणार आहे.
‘जॉनसन अँड जॉनसन’ने भारतात लसीकरणासाठी मागितली परवानगी
देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस दिले जात आहेत. या तिन्ही लसींचे दोन डोस दिले जात आहेत. आतापर्यंत या लसींच्या माध्यमातून ४९.५३ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जर जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी मिळाली, तर सिंगल डोस असलेली पहिली लस ठरेल.
जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी मिळाल्यास देशातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार आहे. कोरोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.