मोदी सरकारच्या नामांतराच्या निर्णयावरुन दिग्विजय सिंह यांची खोचक टीका


नवी दिल्ली – आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव करण्यात आले असून यासंदर्भात ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिलेली असतानाच दुसरीकडे काँग्रेसकडून यावर आक्षेप घेतला जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी खोचक टीका केली आहे. तसेच, यालाच इंग्रजीमध्ये Meglomania असे म्हणतात, असे देखील त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये दिग्विजय सिंह यांनी मोदींच्या या घोषणेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. आधी अहमदाबादच्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केले. मला आश्चर्य वाटले, जेव्हा त्यांनी मेजर ध्यानचंद जीच्या नावे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव ठेवले, असे दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी या ट्वीटमध्ये मोदींना खोचक टोला देखील लगावला आहे. मला तर वाटले होते की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात, असे देखील दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. आपण सर्वश्रेष्ठ असल्याची भावना मनात निर्माण होणे, याला Megalomania म्हणतात.

देशभरातून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची विनंती येत होती. नागरिकांच्या या विनंतीनंतर हे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसकडून आक्षेप घेतला जात आहे.