भारतीय महिला हॉकी संघातील हरियाणाच्या खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा


हरियाणा : ग्रेट ब्रिटनकडून भारतीय महिला हॉकी संघाचा 4-3 असा पराभव झाला. इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली, पण एका गोलच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र भारतीय महिलांचा पराभव होऊनही त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान भारतीय महिला हॉकी टीममधील हरियाणाच्या खेळाडूंसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीय हॉकी टीममधील हरियाणातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 50-50 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, ब्रिटनचा संघ कमी फरकाने जिंकला, भारतीय संघाने खूप चांगली कामगिरी केली. हॉकी टीममधील हरियाणाच्या सर्व 9 खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याची मी घोषणा करतो, असे ते म्हणाले.

41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, मात्र ते अपुरे पडले. भारतीय महिला संघाचा पराभव झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत संघाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत, आपण महिला हॉकीत पदक मिळवू शकलो नाही. पण ही टीम न्यू इंडियाची भावना दर्शवते, आपण सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ऑलिम्पिकमधील भारतीय महिला संघाचे हे यश भारताच्या मुलींना हॉकी खेळाकडे आकर्षित करायला प्रेरित करणारी आहे. आम्हाला संघाचा गर्व असल्याचे म्हटेल आहे. मोदींनी पुढे म्हटले की, आम्ही महिला हॉकी टीमच्या या शानदार खेळीला नेहमी लक्षात ठेवू. त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. टीमच्या प्रत्येक सदस्याचे योगदान उल्लेखनीय आहे. भारताच्या शानदार संघाचा गर्व आहे.

ब्रिटनने सामन्याच्या सुरुवातीला आक्रमक खेळी केली. ब्रिटनने सामन्यात 2-0 ने आघाडी घेतल्यानंतर भारताने सलग तीन गोल करत 3-2 अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी भारतीय महिलांना टिकवता आली नाही. ब्रिटनने पुन्हा वापसी करत सलग दोन गोल डागले आणि 4-3 अशी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत गेल्यावेळच्या गोल्ड मेडल विनर ग्रेट ब्रिटनने कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.