चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केली आपली भूमिका


मुंबई – आज (शुक्रवार) सकाळी साडेअकरा वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट कृष्णकुंज येथे भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भविष्यात भाजप व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, या दोन्ही नेत्यांची मागील २० दिवसांत ही दुसरी भेट असल्यामुळे, चर्चा अधिकच रंगल्या आहेत. दरम्यान, यावर मनसेनेते बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले, जेव्हा चंद्रकांत पाटील आले आणि गेले तेव्हा ते आनंदात होते. त्यांनी माझ्या कानात देखील काहीतरी सांगितले. ते मी सांगू शकत नाही. पण सगळ सकारात्मक होते. कारण आम्ही नकारात्मक विचार नाही करत. आम्ही एकटे लढत होतो, तेव्हाही सकारात्मक होतो आणि आताही आहोत.

यापुर्वी राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर भारतीयांवरील भाषणाचा काही क्लिप पाठवल्या होत्या, यावर दोघांमध्ये चर्चा झाली असेल. तो माझा विषय नाही. तो राज ठाकरेंचा विषय असल्याचे नांदगावकर म्हणाले. भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? यावर बाळा नांदगावकर म्हणाले, राजकारणात काय होईल हे आता सांगू शकत नाही, पण राजकारणात कधीही काहीही होते, हे निश्चित आहे.

भाजप-मनसे युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर असेही सांगितले जात आहे की, भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका भाजपला मान्य नाही. परप्रांतीयांना विरोधाची भूमिका मनसेने बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता दिसत आहे.