जगातील सर्वात उंचीवरचा मोटरेबल रोड आता भारतात, बीआरओची कामगिरी

सीमा सडक संघ म्हणजे बीआरओ ने अथक प्रयत्न आणि प्रतिकूल हवामानाला तोंड देत अतिशय दुर्गम भागात, जगातील सर्वाधिक उंचीवरचा मोटरेबल रोड बांधला आहे. भारतातच नव्हे तर आता जगात हा सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बनला असून या आठवड्याच्या सुरवातीला या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. बीआरओ भारतीय सशस्त्र दलाचा रस्ते तयार करणारा विभाग आहे. देशाच्या उत्तर सीमेवर अति दुर्गम भागात लडाखच्या उमलिंगला येथे १९३०० फुट उंचीवर हा रस्ता बांधून पूर्ण केला गेला आहे.

उंच पहाडाच्या दरम्यान ५२ किमी लांबीच्या या रस्त्यामुळे पूर्व लडाख चुमार सेक्टर मधील महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत. रक्षा मंत्रालयाने या संदर्भातील एक पत्रक बुधवारी प्रसिद्ध केले असून त्यानुसार स्थानिक लोकांना हा रस्ता वरदान ठरेल असे म्हटले आहे. लेह ते चीसूमले, डेमचोक साठी हा सरळ, पक्का रस्ता झाला आहे. यामुळे या भागातील पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे.

हा रस्ता खडतर खारदुंगला पेक्षाही चालकांसाठी मोठे आव्हान आहे. हिवाळ्यात या भागाचे तापमान उणे ४० अंशांपर्यंत घसरते आणि येथे प्राणवायूचे प्रमाण कमी असल्याने अधिक काळ थांबणे शक्य होत नाही. या रस्त्याने बोलिव्हिया येथील १८९५३ फुट उंचीवरच्या रस्त्याचे रेकॉर्ड मोडले आहे. बोलिव्हिया मधील रस्ता उडूरुंकू नावाच्या ज्वालामुखीला जोडणारा असून तो आत्तापर्यंत जगातील सर्वाधिक उंचीवरचा मोटरेबल रोड होता.