यंदा प्रदूषणमुक्त, या सुंदर दऱ्या खोऱ्यात करा भटकंती

करोना मुळे घरात बसून कंटाळलेल्या जनतेला भटकंतीचे वेध लागले आहेत. यावेळी लोकप्रिय पर्यटन स्थळावरील गर्दी पासून सुटका आणि प्रदूषणमुक्त वातावरण हवे असेल तर भारतातील या सुंदर दऱ्या खोऱ्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. मुक्त निसर्गसौंदर्य आणि साहसी पर्यटन असे दोन पक्षी एकच दगडात येथे साधता येतील. शिवाय उंच पर्वत रांगा, नद्यांची खोरी यातील हे पर्यटन वेगळा आनंद देईल हे निश्चित.

भारतात युनेस्कोने जागतिक वारसा यादीत सामील केलेल्या दोन दऱ्या म्हणजे हिमाचल मधील कांगडा आणि उत्तराखंड मधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. कांगडा व्हॅली मध्ये देवदारची घनदाट जंगले, बागा, बर्फाळ शिखरातून वाहणारया नद्या पाहायला मिळतील. १५९५६ फुट उंचीवरची ही व्हॅली माउंटन बायकिंग साठी सुद्धा उत्तम. कांगडा मंदिर, कांगडा किल्ला, पालनपूर, धर्मशाला येथेही भेटी देऊ शकता.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ला युनेस्कोने २००५ मध्ये जागतिक वारसा यादीत सामील केले आहे. हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले असून प.हिमालयाच्या पर्वत रांगामध्ये असलेली ही व्हॅली, फोटोग्राफी आणि ट्रेकर्स साठी स्वर्ग आहे.

मणिपूर आणि नागालँड सीमेवरची जुकाऊ व्हॅली अतिशय आकर्षक आहे. थंडीत येथे बर्फाचे चादर असते तर उन्हात सुंदर फुलांचे गालिचे येथे पाहायला मिळतात. ३०४८ मीटर उंचीवरचे हे स्थळ ट्रेकिंग, हायकिंग करण्याऱ्याना मोहात पाडते.

बर्फाळ प्रदेशात जायचे नसेल तर केरळची सायलेंट व्हॅली आहेच. पश्चिम घाटात कुंडली पर्वतरांगा मधले हे राष्ट्रीय उद्यान. हिरवीगार जंगले, वन्य प्राणी, दुर्मिळ वनस्पती, दुर्लभ जीवजंतू याच्या साठी प्रसिद्ध आहे.

पंजाब मधली सतलुज व्हॅली उत्तर भारतातील एक सुंदर, निसर्गरम्य ठिकाण आहे. खडकाळ प्रदेश, भोवती हिमशिखरे असली तरी सतलुज नदी परिसरात असल्याने हा सारा परिसर हिरवागार आहे. हे देशातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे.

डाकू, दरोडेखोर याच्या वास्तव्यामुळे बदनाम झालेले मध्य प्रदेशातील चंबळ खोरे आता मध्यप्रदेशातील प्रमुख आकर्षण ठरले आहे. चंबळ नदीवरचे हे खोरे सदाबहार जंगले आणि मनमोहक निसर्गदृश्ये यासाठी पर्यटकांना भावते आहे.

सिक्किमची थुम्चांग व्हॅली हे सर्वात सुंदर नदी खोरे म्हणून प्रसिद्ध आहे. गंगटोक पासून १४० किमी वर असलेले हे खोरे फुल घाटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. समुद्रसपाटी पासून ३५६४ मीटर उंचीवर असलेल्या या व्हॅलीमध्ये झरे, हिरवीगार कुरणे नजर ठरू देत नाहीत. हिमपातामुळे दरवर्षी डिसेंबर ते मार्च या काळात येथे जाता येत नाही.