मीराबाई चानूने दिला कृतज्ञतेचा भावूक अनुभव
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिले रजत पदक मिळवून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचे मायदेशात जोरदार स्वागत होणे साहजिक होतेच पण हे सर्व सन्मान स्वीकारत असताना मीराबाईच्या मनात काय विचार येत होते हे ऐकले की मीराबाईविषयीचा अभिमान कुणाही भारतीयाच्या हृदयात दाटून येईल यात शंकाच नाही.
मणिपूर मधल्या आपल्या गावी पोहोचताच मीराबाईने तिच्या मनातील कृतज्ञता व्यक्त करणारी एक कृती केली. तिला प्रशिक्षण काळात, म्हणजे तिचे कर्तृत्व सिद्ध होण्याच्या अगोदरच, घरापासून २५ किमीवर असलेल्या प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोफत लिफ्ट देणाऱ्या ट्रकचालकांचा शोध घेऊन त्यांना घरी बोलावून सन्मानाने त्यांना गिफ्ट देण्याची. आपल्या विजयातील या अनाम ट्रक ड्रायव्हर्सचे योगदान ती विसरली नाही हे विशेष.
मीराबाई सांगते, प्रशिक्षण दरम्यान हे ट्रक ड्राईव्हर्स तिला इम्फाळ येथील लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत लिफ्ट देत असत तीही मोफत. या प्रवासासाठी एरव्ही तिला १० ते २० रुपये खर्च आला असता. पण हे पैसे वाचत आणि त्यातून मीराबाई तिच्या न्याहारीची सोय करत असे. मीराबाईच्या आईची देवी गावात चहाची टपरी आहे. वाळू वाहतूक करणारे हे ट्रकचालक चहा पिण्यासाठी येथे थांबत. ट्रेनिंगची सुरवात झाल्यावर मीराबाईला हे ट्रकचालक प्रशिक्षण केंद्रावर सोडत असत.
घरी पोहोचल्यावर मीराबाईने ५ ऑगस्ट रोजी या ट्रकचालकांना घरी बोलावून त्यांना गिफ्ट दिल्या त्यापूर्वी या अज्ञात ट्रकचालकांचा शोध तिच्या कुटुंबाने घेऊन त्यांना घरी निमंत्रित केले होते.