Tokyo Olympics : शेवटच्या काही सेकंदांमध्ये हुकले दीपक पुनियाचे कांस्यपदक


टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमधील ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत झालेल्या दीपक पुनियाचा कांस्यपदकाच्या सामन्यातही पराभव झाला आहे. त्याला मायलीस अ‍ॅमिनेलाने ३-२ ने पराभूत केले आहे. विशेष म्हणजे शेवटच्या १० सेकंदामध्ये दीपक पुनियाचा पराभव झाला.

पहिल्या तीन मिनिटांनंतर स्कोअरकार्ड २-१ असा होता. पण सामन्यातील शेवटच्या तीन मिनिटांमध्ये दीपकने आक्रमक पद्धतीने खेळून गुण मिळवण्याऐवजी बचावात्मक पवित्रा स्वीकारला आणि तिथेच त्याला फटका बसला. सामन्यातील अगदी २० सेकंद उरलेले असताना मायलीसने त्याचा पाय पकडला आणि १० सेकंदांहून कमी वेळ शिल्लक असताना मायलीसने पुनियाविरोधात दोन गुण पटकावल्यामुळेच आधीचा एक गुण आणि हे दोन गुण असे एकूण ३ गुण मिळाल्यामुळे मायलीस विजेता ठरला. सामन्याच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये मिळालेल्या या गुणांसंदर्भात पुनियाने चॅलेंज केले. पण सर्व पंचांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पाहून आपला दोन गुण देण्याचा निर्णय कायम ठेवला.