भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट


मुंबई: नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर पाटील यांनी पुण्यात राज ठाकरे यांचे कौतुक केल्यामुळे भाजप-मनसेची युती होईल का अशी चर्चा सुरू झाली. अशात आता उद्या राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी चंद्रकांत पाटील भेट घेणार आहेत. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटील उद्या सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट देतील असे वृत्त आहे. या दोन नेत्यांची नाशिकमध्ये भेट झाल्यानंतर त्यांच्यात काहीशी जवळीक वाढल्याचे दिसत होते. त्यात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात राज ठाकरेंचे कौतुक केल्यानंतर हे दोन पक्ष राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येऊ पाहत आहेत का या चर्चेला बळ मिळाले.

अवघ्या काही महिन्यांवर मुंबई, ठाणे आणि पुणे, नाशिक, पिंपरीचिंचवडसह राज्यातील जवळजवळ १० महापालिकांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या या निवडणुका अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात. एवढेच नाही तर पुढील वर्षी राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या देखील निवडणुका होत आहेत.

भाजपची साथ सोडत शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता हस्तगत केली. यानंतर भाजप एकटा पडला आहे. शिवसेनेला शह देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला एका चांगल्या मित्रपक्षाची आवश्यकता भासत असून त्याला तो मित्र मनसेच्या रुपात दिसू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उद्या या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत चर्चा करतील का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप आपण पाहिल्याचे म्हटले आहे. मी त्या क्लिप पाहिल्या आहेत. त्यांच्या भाषणातील परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेबद्दल काही शंका आहेत. त्या राज यांना भेटून मी विचारेन. मी माझे म्हणणे त्यांच्यासमोर ठेवेन, असे पाटील म्हणाले होते. त्यानुसार पाटील या मुद्द्यावर राज यांच्याशी चर्चा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

परप्रांतीयांना मनसेचा असलेला विरोध ही युतीतील अडचण असल्याचे पाटील यांनी मान्य केले होते. ही अडचण दूर झाली तर आपली काही हरकत नसल्याचे ते म्हणाले होते. पण, युतीबाबतचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आमचा पक्ष या संदर्भात निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.