भाजपच्या आगामी काळातील युतीवर अमृता फडणवीस यांचे भाष्य


पुणे – महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी युतीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुमकुवत असून, ते केव्हा पडेल याचा काही नेम नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला हे सरकार पडावे, असा ध्यास लागला आहे. हे सरकार जर पडले, तर भाजप चांगला पर्याय देईल, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी भाजपच्या आगामी काळातील युतीबद्दल भाष्य केले आहे.

अमृता फडणवीस एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, दिल्लीमध्ये जे नेते आज भेटत आहेत, ते अगोदरपासून भेटत आले आहेत. अचानक भेटले नाहीत. त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार खूप कुमकुवत आहे. हे सरकार केव्हा पडेल, असाच ध्यास प्रत्येकाला लागला आहे. जर हे सरकार पडले, तर भाजप एक चांगला पर्याय देईल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

भाजप याच मुद्द्याला धरून चांगला पर्याय देऊ शकते, असे आपण म्हणता, पण भाजप नेमके कुणाला सोबत घेणार?, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मी यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेन, असे उत्तर त्यांनी दिले.

सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याला विरोध होत असल्याच्या मुद्द्यावरही अमृता फडणवीसांनी भाष्य केले. आपण राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा असून, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील. हा राग त्यांच्या मनात असेल, त्याबद्दल मला माहिती नाही. पण असे व्हायला नको, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.