भारतीय हॉकी टीमने जिंकले ब्राँझ, संपविला ४१ वर्षांचा पदक दुष्काळ

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी भारतीय पुरुष हॉकी टीमने जर्मनीला हरवून कांस्य पदकावर कब्जा केला. या विजयाबरोबरच हॉकी टीमने ऑलिम्पिक स्पर्धेतला ४१ वर्षाचा पदक दुष्काळ संपविण्याचा पराक्रम केला. जर्मनीला ५ -४ अशी धूळ चारत भारताने हे मेडल हस्तगत केले. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय हॉकी टीमचे अभिनंदन केले आणि हा दिवस सर्व भारतीयांच्या कायम स्मरणात राहील असेही म्हटले आहे.

सुरवातीला सामना सुरु झाल्यावर भारतीय टीम पिछाडीवर पडली होती कारण जर्मनीने पहिल्या दोन मिनिटातच गोल करून भारतीय संघावर सतत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय डिफेंडरच्या लक्षात जर्मनीचा डाव येताच त्यांनी अधिक सावधतेने खेळ केला आणि तिसऱ्या क्वार्टर मध्ये जर्मनीवर बढत घेतल्यावर मागे वळून पाहिलेच नाही.

दुसऱ्या क्वार्टर मध्ये भारताने गोल करून गोल बरोबरी साधली. मात्र त्यानंतर जर्मनीने आणखी दोन गोल नोंदविले. भारताकडून सिमरनजीत ने पहिला गोल केला आणि त्यानंतर हार्दिक सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनीही गोल करून जर्मनीशी बरोबरी केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये रुपिंदरपाल ने आणखी एक गोल करून बढत घेतली आणि त्यापाठोपाठ सिमरनने ५ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात जर्मनीने चौथा गोल केला पण त्यांना विजयाची संधी भारतीय टीमने मिळू दिली नाही.

या विजयामुळे सर्व भारतीय अतिशय आनंदित झाले असून देशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.