भाऊरायाला सुरक्षित राखी पोहोचविण्यासाठी पोस्टाचे वॉटरप्रूफ लिफाफे

भारतात दरवर्षी उत्साहात साजरा होणारा रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमेचा सण जवळ आला असून यंदा २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. करोनामुळे अनेक बहिणी दूर असलेल्या भावाला प्रत्यक्ष राखी बांधू शकणार नाहीत किंवा भाऊराया बहिणीकडे येऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भावाला वेळेवर, सुरक्षितपणे बहिणीची राखी पोहोचावी यासाठी टपाल विभाग कामाला लागला आहे.

हे दिवस पावसाचे आहेत त्यामुळे कागदी पाकिटातून पाठविलेल्या राख्या खराब होऊ शकतात हे लक्षात घेऊन पोस्टाने १० रुपयात वॉटरप्रूफ लिफाफे उपलब्ध करून दिले आहेत. पाच रुपयाचे तिकीट लावून हे लिफाफे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पाठविता येतील. तसेच स्पीड पोस्ट सेवा सुद्धा अधिक वेगवान करण्यात आली असून स्पीड पोस्टने पाठविलेल्या राख्या दुसरे दिवशी डिलिव्हर होणार आहेत.

पोस्टाचे कर्मचारी रविवारी सुद्धा राख्या पोहोचविण्याचे काम करणार आहेत तसेच रोजच्या कामात आणखी जादा १ तास काम करणार आहेत. पोस्ट विभागाकडे आत्तापासूनच राखी पार्सल मोठ्या संखेने जमा होऊ लागल्याचे सांगितले जात आहे.