घोस्ट वेडिंग प्रथेबद्दल कधी ऐकलेय?

तंत्रज्ञान क्षेत्रात चीन अतिशय प्रगत देश म्हणून पुढे आला असला तरी या देशात आजही अंधविश्वास खुपच मोठ्या प्रमाणावर आहे. याचे उत्तम उदाहरण आहे घोस्ट वेडिंग किंवा भुताचा विवाह ही प्रथा. गेली ३ हजार वर्षे ही प्रथा पाळली जात आहे. यामागे असा विश्वास आहे की कुणी अविवाहित व्यक्ती मरण पावली तर मृत्युनंतरच्या जगात ती एकटी राहू नये म्हणून त्याचे जिवंत नातेवाईक या मृत व्यक्तीचे लग्न लावून देतात. त्यासाठी अनुष्ठाने केली जातात.

यात वधूला रितीप्रमाणे हुंडा दिला जातो. फॅमिली मॅच मेकिंग फेंग शुई तज्ञ लोकांकडून केले जाते. लग्न विधी मध्ये मृत वधू, वर, यांच्यावर अंतिम संस्कारच्या वेळी वापरली गेलेली प्लेट ठेवली जाते. या विवाहानिमित्त मेजवानी सुद्धा दिली जाते.

विवाह करताना मृत मुलीच्या कबरीतील हाडे काढून ती मृत मुलाच्या कबरी मध्ये ठेवली जातात. काही वेळा मृत मुलगी किंवा तिची हाडे उपलब्ध होत नसतील तर जिवंत मुलीला ठार करून तिच्या प्रेताबरोबर हा विवाह लावला जातो.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार २०१५ मध्ये शांक्सी प्रांतात एका गावात १४ महिलांची प्रेते चोरीला गेली होती. कबरस्थानावर हल्ला करून ही प्रेते चोरली गेली आणि घोस्ट वेडिंग साठी मोठमोठ्या रकमा घेऊन विकली गेली. विश्वविद्यालयातील चीनी विभाग प्रमुख जिंगचुंक यांनी २००८ ते २०१० या काळात घोस्ट वेडिंगचे अध्ययन केले होते. तेव्हा मृत मुलीच्या हाडांची किंमत ३० ते ५० हजार युआन होती. आत्ता ती १ लाख युआन पर्यंत गेली आहे.

२००६ सालापासून चीन मध्ये प्रेते विक्रीवर बंदी घातली गेली आहे तरीही येथे मोठ्या प्रमाणावर घोस्ट वेडिंग होतच असतात.