द. आशियातील सर्वाधिक श्रीमंत गाव, माधापर

द.आशियातील सर्वाधिक श्रीमंत गाव गुजराथच्या कच्छ मध्ये असून या गावाचे नाव आहे मधापर. ७६०० उबऱ्यांच्या या गावात एकापेक्षा एक देखणी घरे आहेतच पण अशी एकही सुखसुविधा नाही जी येथे उपलब्ध नाही. या छोट्याश्या गावात १७ बँका असून त्यात प्रचंड रकमांच्या ठेवी जमा आहेत. या गावाचे कृषी उत्पन्न सुद्धा जोरदार आहे. या गावाचे कनेक्शन थेट लंडन युरोप शी आहे. कारण या गावातील निम्मी जनता परदेशात वास्तव्य करून आहे आणि तेथून गावाकडे सतत पैशांचा ओघ सुरु आहे.

या गावातील गावकऱ्यांचा लंडन मध्ये क्लब आहे आणि त्याचे ऑफिस गावात आहे. १९६८ मध्ये माधापर व्हिलेज असोसिएशनची स्थापना लंडन मध्ये केली गेली असून ब्रिटन मध्ये राहणारे या गावाचे गावकरी अनेक निमित्ताने एकमेकांना या क्लब मध्ये भेटतात. या गावात १७ मान्यवर बँकांच्या शाखा आहेत आणि त्यातील ठेवींची रक्कम आहे ५ हजार कोटी. गावाच्या पोस्टात सुद्धा २०० कोटींच्या ठेवी आहेत.

या गावातील गावकऱ्यांनी नोकरी व्यवसायासाठी देशातील अन्य शहरात जाण्यापेक्षा लंडन, कॅनडा, केनिया, युगांडा, मोझाम्बिक, द. आफ्रिका, तंजानिया या ठिकाणी जाणे पसंत केले आणि तेथेच वास्तव्य केले पण स्वतःच्या गावाचा विसर त्यांना पडलेला नाही. गावकरयांच्या संपर्कात हे परदेशी नागरिक सतत आहेत. प्रत्येक घरातील किमान दोन लोक परदेशात आहेत.

या छोट्याश्या गावात प्ले स्कूल, शाळा, कॉलेज, आहेतच पण स्वीमिंग पूल, तलाव अश्या सुविधा आहेत. या गावातील शॉपिंग मॉल मध्ये जगभरातील नामांकित ब्रांडच्या वस्तू मिळतात. येथील लोक शेती करतात. त्यांनी जमिनी विकलेल्या नाहीत. गावात अत्याधुनिक गोशाला आहे, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल अश्या सुविधाही आहेत.