खासगी संस्था सुद्धा देऊ शकणार ड्रायव्हिंग लायसन्स

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयाने वाहनचालक परवाना संदर्भातील सध्याच्या नियमात बदल केला असून त्या संदर्भातील माहिती बुधवारी देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार काही अटी पाळून मान्यताप्राप्त खासगी कंपन्या, एनजीओ, खासगी/ ऑटो असोसिएशन वाहन निर्मात्या कंपन्या, स्वायत्त संस्था, खासगी वाहन निर्माते चालक प्रशिक्षण केंद्रे यापुढे वाहन चालक परवाने देऊ शकतील. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाने देण्याचे काम सुरूच राहणार आहे असा खुलासा केला गेला आहे.

वरील कंपन्या त्यांना वाहन चालक परवाना देण्याच्या मान्यतेसाठी अर्ज करू शकतील. त्यासाठी नियमानुसार आवश्यक सुविधा त्यांनी उपलब्ध करायच्या आहेत आणि त्यासाठीची आर्थिक क्षमता दाखवायची आहे. राज्य सरकारांवर मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रे व मान्यता प्रदान करण्याचे तंत्रज्ञान याचा व्यापक प्रचार करण्याची जबाबदारी सोपविली गेली आहे. संबंधित संस्थांनी अर्ज केल्यावर ६० दिवसात त्यांना मान्यता दिली जाणार आहे असे समजते.