Tokyo Olympics : भारताचे आणखी एक पदक निश्चित; कुस्तीपटू रवि दहिया अंतिम फेरीत


टोकियो : भारताला आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगले यश मिळाले आहे. लवलीनाने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवल्यानंतर आता कुस्तीत रवि दहियाने अंतिम फेरी गाठली आहे. भारताचे आणखी एक पदक रविच्या या विजयामुळे निश्चित झालं आहे. त्याने कझाकिस्तानच्या पैलवानाला सेमीफायनलमध्ये नमवत अंतिम फेरी गाठली आहे. रविने अंतिम फेरीत विजय मिळवला तर भारताला सुवर्णपदक मिळेल, जर तो तिथे पराभूत झाला तरी रौप्यपदक निश्चित झाले आहे.

रविने हे यश पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात मिळवले आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियाने आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दीपक पुनियाच्या कामगिरीकडेही लक्ष लागून आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये रवि दहिया विरुद्ध कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोस उरबानो यांच्यातील पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविने शानदार विजय मिळवला होता. प्री क्वार्टर फायनल सामन्यात त्याने कोलंबियाच्या कुस्तीपटूला 13-2 असा पराभव केला. क्वार्टर फायनलमध्ये त्याने बलगेरियाच्या कुस्तीपटूला 14-4 असं पराभूत करत पुढची फेरी गाठली होती.