शास्त्रज्ञांनी सुरु केले ऑल इन वन ‘सुपर व्हॅक्सिन’वर काम


लंडन: आपल्यापैकी कोणाही दोन वर्षांपूर्वी आपल्याच माणसांपासून दूर राहावे लागेल, त्यांच्यापासून अंतर ठेवावे लागेल, स्वत:लाच घरात कोंडून घ्यावे लागेल याची कल्पना केली नव्हती. पण माणसाला या सगळ्या गोष्टी कोरोना संकटामुळे कराव्या लागल्या. अनेकांनी या कालावधीत आपल्या कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील माणसे गमावली. आता कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. पण आता कोरोना नव्या व्हेरिएंटच्या माध्यमातून समोर येत असल्यामुळे संपूर्ण जगभरात वापरता येईल अशा सुपर व्हॅक्सिनवर शास्त्रज्ञांनी काम सुरू केले आहे.

संपूर्ण जगात कोरोना महामारीने धुमाकूळ घातल्यामुळे लाखो लोकांचे प्राण गेले. अशा संकटाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोएलेशन फॉर एपिडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशन्सने (सीईपीआय) ५ वर्षांची योजना सुरू केली. २.५ बिलियन पाऊंड्स यावर खर्च करण्यात येत आहे. सध्या शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरू शकणारी लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अमेरिकन कंपनी व्हीबीआय व्हॅक्सिन्ससोबत यासाठी करार करण्यात आला आहे.

कोरोनाच्या संभाव्य व्हेरिएंट्सचा धोका लक्षात घेऊन ऑल इन वन लस तयार केली जात आहे. कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्समधील समान गोष्टींचा अभ्यास करून ऑल इन वन व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात येईल. आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा व्हेरिएंट आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर देशात डेल्टा प्लसचेदेखील रुग्ण आढळून आले.