शिवलिंगाचे हे भाग म्हणजे विविध प्रतीके

येत्या ९ ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरवात होत आहे. हा महिना शिव आराधनेचा महिना म्हणून विशेष मानला जातो. शिवपूजनाची प्रथा फार प्राचीन आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात विविध देशात फार पूर्वीपासून शिवपूजन होत होते याचे अनेक संदर्भ आणि पुरावे मिळतात. शिवमंदिरात शिवाची मूर्ती फारशी दिसत नाही तर शिवलिंगाचीच पूजा केली जाते.

शिवलिंग हे तीन भागांचे बनलेले असते आणि हे तिन्ही भाग विविध प्रतिकस्वरूप आहेत. त्यामागे निश्चित विज्ञान सुद्धा आहे. शिवलिंगामध्ये सर्वात खालचा भूमीला लागून असलेला एक भाग, समान पातळीवर असलेला मध्य भाग आणि त्यावर उभट आकाराचा उंच भाग अशी विभागणी असते. सर्वात वरच्या शिवलिंगाची उंची संपूर्ण मंडळाच्या परिघाच्या १/३ असते असे सांगतात. शिवलिंग हे पुरुष आणि प्रकृती यांचेही प्रतिक मानले जाते. शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो , शीर्ष भागात माथ्यावर एक त्रिपुंड बिंदू असतो, तेथे तीन रेषा सामान अंतरावर काढल्या जातात त्याबाबत अनेक स्पष्टीकरणे दिली जातात.

भूमीला लागून असलेला किंवा भूमिगत असलेला भाग हे ब्रह्माचे प्रतिक आहे. मधला भाग विष्णूचे प्रतिक तर शीर्ष भाग शिवाचे प्रतिक मानले जाते. या संदर्भात तज्ञ विविध स्पष्टीकरणे देतात. प्राचीन काळापासून मेसोपोटेमिया, बॅबीलॉन संस्कृतीत शिवपूजा होती याचे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत. मोहनजोदारो हडप्पा या विकसित संस्कृती मध्ये सुद्धा शिवपूजा होती त्याचा अवशेष आजही मिळतात.

मानवी जीवन सुरवातीला पशु आणि निसर्ग यावरच अवलंबून होते त्यामुळे पशु संरक्षक म्हणून पशुपती पूजा केली जात असे असेही सांगतात. शिवलिंग दोन प्रकारची मानतात. एक आकाशीय उल्का आणि दुसरे पारद. पण पुराणानुसार शिवलिंगे सहा प्रकारची आहेत. त्यातील पाहिले आहे देवलिंग. म्हणजे जी शिवलिंग देव अथवा देवतांनी स्थापन केली ती. दुसरे आहे असुर लिंग. याची स्थापना राक्षस किंवा असुरांनी स्थापन केलेले शिवलिंग. उदाहरण रावणाने स्थापन केलेले शिवलिंग असुर लिंग मानले जाते.

तिसरा प्रकार अर्शलिंग. म्हणजे अगस्त्य मुनी सारख्या मुनींनी, संतांनी स्थापन केलेली शिवलिंगे. चौथा प्रकार आहे पुराण लिंग. पौराणिक काळातील व्यक्तींनी स्थापन केलेली शिवलिंगे या प्रकारात येतात. पाचवे आहे मनुष्य लिंग म्हणजे प्राचीन किंवा मध्य काळात राजे, सम्राट, ऐतिहासिक महापुरुष, श्रीमंत व्यक्ती यांनी स्थापन केलेली शिवलिंगे.

सहावा प्रकार आहे स्वयंभू लिंग. हे शिवलिंग स्वतःच प्रकट झालेले असते. भारतात अनेक ठिकाणी स्वयंभू शिवलिंगे आहेत. आंध्रप्रदेशात बोरा गुहेतील सिद्धेश्वरनाथ, अमरनाथ, कादावूल मंदिरातील ३ फुट उंचीचे स्फटिक शिवलिंग ही याची काही उदाहरणे. सिंधू संस्कृती उत्खननात भाजलेल्या मातीची शिवलिंगे सुद्धा सापडली आहेत. ३५०० ते २३०० इसवी पूर्व शिवपूजा होत होती असे पुरावे मिळतात.