बेजोस, ब्रॅसनन अंतराळवीर नाहीत तर अंतराळ प्रवासी

अमेरिकेच्या फेडरल अॅव्हीएशन अॅडमिनीस्ट्रेशन ने अंतराळवीर असा दर्जा मिळण्यासाठी जरुरी असलेल्या नियमात नुकताच बदल केला आहे. त्यानुसार किमान ५० मैल किंवा ८०.४६ किमी उंचीवर उड्डाण केलेल्यांनाच अंतराळवीर हा दर्जा मिळणार आहे. परिणामी अंतराळ सफर करून आलेले जगातील दोन अब्जाधीश रिचर्ड ब्रॅसनन आणि जेफ बेजोस यांनी जुलै महिन्यात त्यांच्या खासगी कंपनींच्या यानातून अंतराळप्रवास करण्याचा विक्रम केला असला तरी त्यांना अंतराळवीर हा दर्जा दिला जाणार नाही तर त्यांना स्पेस टुरिस्ट किंवा अंतराळ प्रवासी असाच दर्जा मिळणार आहे.

अंतराळात झेप घेणारे जगातील पहिले अब्जाधीश प्रवासी म्हणून रिचर्ड यांच्या नावाची नोंद झाली आहे तर दुसरे अब्जाधीश प्रवासी म्हणून जेफ बेजोस यांच्या नावाची नोंद झाली आहे. जुन्या नियमानुसार हे दोघेही अंतराळवीर ठरू शकले असते कारण अंतराळ प्रवासाच्या फेडरल अॅव्हीएशन अॅडमिनीस्ट्रेशनच्या सर्व कसोट्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या. मात्र २००४ मध्ये ही संस्था स्थापन झाल्यावर प्रथमच तिचे नियम बदलले गेले आहेत.

फेडरल अॅव्हीएशन अॅडमिनीस्ट्रेशनने केलेल्या खुलाशानुसार स्पेस ऑपरेशनच्या सार्वजनिक सुरक्षेप्रती त्यांची भूमिका स्पष्ट असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. फ्लाईट क्रू जेव्हा उड्डाणादरम्यान सुरक्षा गतिविधिचे प्रदर्शन करेल तेव्हाच त्याला अंतराळवीर दर्जा मिळेल. स्पेस टुरिस्ट ही मानद पदवी असून या पदवीला कायदेशीर महत्व नाही असा ही खुलासा केला गेला आहे.