निलगिरी पर्वतरांगात फुलली कुरुंजी

भारतात दर १२ वर्षांनी महाकुंभ भरतो तसेच एक खास फुल सुद्धा दर १२ वर्षांनी उमलते. केरळच्या निलगिरी पर्वत रांगा, यावर्षी जगात एक असाधारण मानले जाणाऱ्या नीलकुरुंजी फुलांनी बहरल्या असून चोहीकडे निळा जांभळा झिम्मा सुरु झाला आहे. पर्यटक या नयन सोहळ्याची अक्षरशः प्रतीक्षा करत असतात. सध्या निलगिरी पर्वत रांगा गडद हिरव्या निळसर रंगानी नटल्या असून ही फुले पूर्ण फुलल्यावर जांभळी होतात.

केरळ मधील प्रसिद्ध आणि नितांतसुंदर हिलस्टेशन मुन्नार हे नीलकुरुंजीचे सर्वात मोठे घर मानले जाते. ३ हजार हेक्टर वळणदार पर्वतरांगा असलेले हे खास ठिकाण पर्यटकांचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. नीलकुरुंजी फुलली की मुन्नारचे सौंदर्य आणखी मोहरून येते. केरळ मध्ये या फुलांना नुसते कुरुंजी म्हटले जाते. कुरुंजीच्या सुमारे ३५० प्रजाती असून त्यातील काही ४ वर्षांनी, काही ८, काही १० तर काही १२ वर्षांनी एकदा फुलतात. काही प्रजाती १६ वर्षातून एकदाच फुलतात आणि त्यांच्या फुलण्याचा काळ वेगवेगळा असतो.

केरळच्या जंगलात ३२ चौ.किमीचा परिसर २००६ पासून कुरुंजी अभयारण्य म्हणून संरक्षित केला गेला आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंतर हे दुसरे फुले अभयारण्य आहे. येथे कुरुंजीच्या सर्व प्रजाती संरक्षित आहेत. असे सांगतात की मुथूवन जनजातीचे लोक कुरुंजीला प्रेम आणि रोमांस यांचे प्रतिक मानतात. पारंपारिक कथेनुसार भगवान मुरुगा याने शिकाऱ्याची मुलगी वेली हिच्याबरोबर लग्न करताना याच फुलांची माळ तिच्या गळ्यात घातली होती. केरळ मध्ये नीलकुरुंजी फुलली की राज्याच्या पर्यटनात मोठी वाढ होते असेही सांगतात.