देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ; महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश


नवी दिल्ली – देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावातील तेजीमुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशभरात असे १८ जिल्हे आहेत, जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. यापैकी १० जिल्हे केवळ केरळमधील आहेत. तर यामध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

याबाबत माहिती देताना आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील ५७ जिल्ह्यांमध्ये दररोज १०० रुग्ण आढळत आहेत. तसेच देशातील १८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामध्ये केरळमधील १०, महाराष्ट्रातील ३, मणिपूरमधील २, अरुणाचल, मेघालय आणि मिझोरामच्या १-१ जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच देशात ४४ जिल्हे असे आहेत जेथे १०% पेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी रेट आहे. हे ४४ जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, पुद्दुचेरी, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेशातील आहेत.

दरम्यान लव अग्रवाल म्हणाले की, जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. भारताचा जोपर्यंत प्रश्न आहे, तोपर्यंतद कोरोनाची दुसरी लाट देशात अद्याप संपलेली नाही. देशात आतापर्यंत ४७.८५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी ३७.२६ कोटी जणांना पहिला डोस मिळाला आहे आणि १०.५९ कोटी जणांना दोन्ही मिळाले आहेत. मे महिन्यात १९.६ लाख डोस आणि जुलैमध्ये ४३.४१ लाख डोस देण्यात आले आहेत. म्हणजेच, मे महिन्यात ज्यांना लसीचा डोस देण्यात आला त्यांच्या तुलनेत ही संख्या जुलैमध्ये दुप्पट आहे.