शिवबंधन तोडत माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंनी धरला काँग्रेसचा हात


मुंबई – शिवबंधन तोडत शिवसेना उपनेते, तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री असलेल्या अशोक शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे हे माजी आमदार आहेत. ते तीन वेळा आमदार होते. तर, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना राज्यमंत्रीपद देखील अशोक शिंदे यांना देण्यात आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून तीन वेळा आमदार राहिलेल्या अशोक शिंदे यांचा पराभव झाला होता.

ते मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे व वरिष्ठ नेतेमंडळींकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्यामुळे नाराज होते, असे सांगितले जात आहे. यामुळेच त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश सांगितले जात आहे.