९ ऑगस्टला पं. मोदींच्या शिरपेचात आणखी एका मानाचे पान

या महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचे पान खोचले जाणार आहे. आजपर्यंत कोणत्याच भारतीय पंतप्रधानाला न मिळालेली ही संधी मोदींना मिळाली आहे. गेल्या १ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून २ ऑगस्टपासून त्याचे प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. यात ३ महत्वाच्या मुद्द्यांवर बैठका होणार असून ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीचे अध्यक्षपद मोदी यांच्या कडे आहे. भारतीय पंतप्रधानांना हा मान प्रथमच मिळाला आहे.

या तीन बैठका तीन वेगळ्या दिवशी होणार आहेत. व्हर्च्युअल कॉन्फरन्स स्वरुपात ९,१८ आणि १९ ऑगस्ट रोजी त्या होणार आहेत. पहिल्या बैठकीत समुद्री सुरक्षा या विषयावर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होत आहे. अन्य दोन बैठकींचे अध्यक्षपद भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भूषविणार आहेत. त्यात शांती स्थापना आणि दहशतवाद प्रहर संबंधी चर्चा होणार आहे.

या संदर्भात बोलताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य टीएस तिरूमूर्ती म्हणाले, ‘भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असताना भारताला अध्यक्षता मिळण्याचा योग आला आहे. १५ देशांचा ताकदवान जागतिक संस्थेचे नेतृत्व आपल्याकडे आहे याचा अभिमान वाटतो. ‘