ओसामा बिन लादेनच्या भावाची हवेली विक्रीसाठी

अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे खात्मा केलेला अल कायदाचा दहशतवादी आणि अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन याचा भाऊ इब्राहीम याच्या मालकीची एक अलिशान हवेली विक्रीसाठी उपलब्ध झाली असून तिची किंमत २ अब्ज डॉलर्स सांगितली जात आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील महागड्या भागात असलेली ही हवेली गेली २० वर्षे रिकामी पडली आहे. ही हवेली विकली जात असल्याची बातमी वेगाने व्हायरल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लॉस एंजेलिस हे मुळातच महाग शहर आहे. त्यात इब्राहीम याने ही हवेली १९८३ साली २० लाख डॉलर्स म्हणजे १ कोटी ४८ लाखात खरेदी केली होती. दोन एकर जमिनीवर असलेली ही हवेली प्रसिद्ध हॉटेल बेल एअर आणि बेल एअर कंट्रीक्लब पासून अगदी जवळ आहे. २००१ मध्ये ओसामाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केल्यापासून ही हवेली रिकामी पडली आहे. या हवेलीत इब्राहीम त्याची माजी पत्नी ख्रिस्तीन हिच्याबरोबर राहत होता. ७ बेडरूम्स आणि पाच बाथरूम्स असलेली ही हवेली १९३१ मध्ये बांधलेली आहे. हवेली भोवती मोठी मोकळी जागा आहे.