अमेरिकेत बंदूक खरेदी जोरात, काडतुसांची टंचाई

करोना काळात अमेरिकेत बंदूक किंवा गन विक्रीत तुफान वाढ झाल्याचा बातम्या यापूर्वीच आल्या आहेत. गन खरेदीचा हा ट्रेंड आजही कायम असून आता काडतुसांची टंचाई जाणवू लागली असल्याचे वृत्त आले आहे. सुरक्षेसाठी आणि शिकारीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बंदुका खरेदी करत असून त्यात महिला ग्राहकांचे प्रमाण ४० टक्के आहे. करोना मुळे नागरिकांना मोकळा वेळ अधिक आहे त्यामुळे शिकारीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला ग्राहकात सिंगल मदर आहेत तसेच आजीबाई सुद्धा आहेत असे समजते.

ज्या प्रमाणात बंदुका खरेदी होते आहे त्या प्रमाणात काडतूस उत्पादन होत नाही. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती असल्याने काडतुसांचे दर वाढले आहेत. काडतूस निर्माते सांगतात आम्ही उत्पादन वाढविले आहे पण साठवणुकीसाठी जागा कमी असल्याने बंदूक विक्रेते कमी खरेदी करत आहेत. याचा परिणाम असा ही झाला आहे की काडतुसे मिळत नसल्याने नॅशनल लॉ एनफोर्समेंट फायर आर्म्स इंस्ट्रक्टर्स असोसिएशन मध्ये बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक प्रशिक्षकांनी त्यांची नोंदणी रद्द केली आहे.

नागरिक काडतुसांची जमाखोरी करत आहेत तसेच दुकानदार सुद्धा जमाखोरी करत आहेत असे सांगितले जात आहे. गेल्या एक वर्षात अमेरिकेत २ कोटी बंदुका विकल्या गेल्या आहेत.