उदार हिरेव्यापारी सावजी ढोलकिया यांनी मुंबईत खरेदी केली १८५ कोटींची इमारत

सुरत येथील हिरेव्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबईतील वरळी सीफेसवर त्यांनी १८५ कोटी रुपये किमतीची इमारत खरेदी केली आहे. दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना मर्सिडीज, मारुती कार्स, फ्लॅट भेट देऊन सावजी ढोलकिया यापूर्वीच उदार दानशूर म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.

ढोलकिया यांनी खरेदी केलेली इमारत एस्सार ग्रुप कंपनीच्या आर्के होल्डिंग्स यांच्या मालकीची होती. त्यांनी ती ढोलकिया यांच्या हरीकृष्णा एक्स्पोर्ट कंपनीला विकली आणि मिळालेल्या रकमेतून कर्जफेड केली असे समजते. या सहा मजली इमारतीचे नाव ‘पनहार’ असे आहे. २० हजार चौरस फुट कार्पेट एरिया असलेल्या या जागेचा दर ९३००० रुपये प्रतीचौरस फुट आहे.

दोन भागात या इमारतीची नोंदणी केली गेली असून पहिले डील ४७ कोटींचे १३५० चौरस मीटर जमिनीचे आहे आणि त्यावर २.५७ कोटी मुद्रांक शुल्क भरले गेले आहे तर दुसरी नोंदणी रहिवासी इमारतीची असून तिची खरेदी १३८ कोटींना झाली आहे. त्यावर ६.९१ कोटी मुद्रांक शुल्क भरले गेले आहे.

ढोलकिया यांनी त्यांच्या कंपनीतील ३ कर्मचाऱ्याना मर्सिडीज कार्स भेट दिल्या होत्या आणि २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांना ४०० फ्लॅट आणि १२६० कार्स भेट दिल्या होत्या. त्यांच्या कंपनीत ५ हजार कर्मचारी असून कंपनीची वार्षिक उलाढाल ६ हजार कोटींची आहे. ही कंपनी ५० देशांना हिरे पुरविते असे समजते.