शिवसेना भवनात नेऊन संजय राऊतांना फटके देऊ; निलेश राणे


मुंबई – शिवसेना भवन तोडण्याची भाषा केल्यानंतर संतापलेल्या शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जर त्यांच्या खांद्यावरुन भाजप बंदूक चालवत असेल, तर मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरे देऊन झाल्यावर थपडीची भाषा खुद्द मुख्यमंत्र्यांनीही केली आहे. तुम्ही शिवसेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचे असेल तर या मग, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर संजय राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.


ट्विट करत निलेश राणे यांनी संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशारा दिला आहे. हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत, असे म्हटले आहे. त्याचबरोबर ट्विटच्या माध्यमातून निलेश राणे यांनी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावरही टीका केली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करत असल्याचे म्हणत निलेश राणेंनी सदा सरवणकर यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, शिवसेना भवन फोडण्याबाबत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आमचे शाखाप्रमुख त्यावर बोलतील, अशी बोचरी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागल्यावर प्रसाद लाड यांनी सारवासारव केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर असून त्यांच्या सेनाभवन फोडण्याचा प्रश्नच नाही. माझ्या बोलण्याचा माध्यमांनी विपर्यास केला असल्याचा खुलासा लाड यांनी केला होता.