राज्यात पुढील 2 महिन्यात सरासरीपेक्षा अधिक राहू शकतो पाऊस


मुंबई – ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. देशात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर संपूर्ण देशात ऑगस्टमध्ये 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येत आहे. पण पुढील दोन महिन्याचा विचार केला, तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून आज पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, महाराष्ट्रात 25 टक्के अधिक पाऊस झाला.

दरम्यान, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात हवामान विभागाकडून मोठा पाऊस होईल अशा अंदाज दुसऱ्या मॉडेलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला. भारतीय हवामान विभागाकडून हा एक नवा प्रयोग केला जात आहे. ज्यात दर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवला जातो आहे. ज्याचा ह्यावर्षी हा पहिलाच प्रयोग आहे.

ऑगस्ट महिन्याचा अंदाज बघितला तर कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी सरासरी गाठताना बघायला मिळत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत देखीलसरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, मॉन्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोलीतील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा विचार केला, तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो.