राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीने मांडली भूमिका; सगळ्यांना विनंती करत म्हणाली…


पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात देखील बऱ्याच चर्चा झाल्या. या सगळ्या विषयी शिल्पाला माहित होते अशा चर्चा सुरु झाल्यानंतर शिल्पाने काही मीडिया ग्रुप्सवर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. दरम्यान, आता तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने या सगळ्यांचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहे ते सांगितले असून कोणतीही खोटी बातमी छापू नका, असे सांगितले आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिल्पाने ही पोस्ट शेअर केली आहे. आमच्यासाठी गेले काही दिवस आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत. माध्यमांनी आणि काही लोकांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आले, प्रश्न विचारले गेले. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी हे करणे टाळत राहणार आहे, कारण हे सगळे प्रकरण न्यायालयीन आहे, म्हणून माझे नाव घेऊन कोणतीही चुकीची विधान पसरवू नका, असे शिल्पा म्हणाली आहे.


शिल्पा पुढे म्हणाली, एक कलाकार म्हणून, कोणत्या गोष्टीची कधीही तक्रार करू नका, कधीही कोणाला समजावून सांगू नका या तत्त्वाचे मी पालन करते. या सगळ्या प्रकरणात माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते, विशेषत: एक आई म्हणून माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. सत्य जाणून घेतल्याशिवाय अर्धवट माहितीच्या आधारे टिप्पणी करू नका. कायद्याचे पालन करणारी मी एक भारतीय नागरीक असून, गेल्या २९ वर्षांपासून मेहनत करत आहे. आज पर्यंत लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला असून मी कोणालाही निराश केले नाही.

पुढे सगळ्यांना विनंती करत शिल्पा म्हणाली, सर्वात महत्वाचे, सगळ्यांना मी विनंती करते की माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकारांचा या वेळी आदर करा. आम्ही मीडिया ट्रायचे पात्र नाही. सत्यमेव जयते!