आता ब्रिटनमध्ये होणार अश्वगंधाच्या औषधावर संशोधन


नवी दिल्ली – कोरोनाबाधितांना अश्वगंधा या वनस्तपीपासून तयार केलेल्या औषधामुळे फायदा होत असल्याचे समोर आल्यानंतर आयुष मंत्रालयाने यूकेच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनसोबत (LSHTM) ‘अश्वगंधा’वर अभ्यास करण्यासाठी करार केला आहे. मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि LSHTM ने अलीकडेच यूकेच्या तीन शहरांमध्ये 2,000 लोकांवर ‘अश्वगंधा’ च्या क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

‘अश्वगंधा’ ज्याला सामान्यतः ‘इंडियन विंटर चेरी’ म्हणून ओळखले जाते, ही एक पारंपरिक भारतीय औषधी वनस्पती असून जी ऊर्जा वाढवते, तणाव कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अश्वगंधा सहज उपलब्ध होणारी असून ओव्हर-द-काउंटर पोषण पूरक आहे. लाँग कोरोनामध्ये ‘अश्वगंधा’चे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. औषधाची चाचणी यशस्वी झाल्यास मोठे यश मिळणार असल्यामुळे भारताच्या पारंपारिक औषधी प्रणालीला वैज्ञानिक वैधता मिळू शकेल. विविध आजारांमध्ये “अश्वगंधा”चे फायदे समजून घेण्यासाठी अनेक अभ्यास झाले असले तरी, आयुष मंत्रालयाने कोरोनाबाधितांवर त्याच्या प्रभावीतेची तपासणी करण्यासाठी परदेशी संस्थेशी सहकार्य करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

याबाबत माहिती देताना एआयआयएच्या संचालिका तनुजा मनोज नेसारी म्हणाल्या, ब्रिटनमध्ये लिसेस्टर, बर्मिंगहॅम आणि लंडनमध्ये अशा दोन हजार रुग्णांवर एक हजारांचा याप्रमाणे दोन गटांत हा अभ्यास येत्या 90 दिवसांत केला जाईल. नंतर 90 दिवस तुलानात्मक अभ्यास होणार आहे. डॉ. नेसारी पुढे म्हणाल्या की भारतात अश्वगंधाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कोरोनाची दिर्घकालीन लक्षणे कमी करण्यात चांगला परिणाम होत असल्यामुळे कोरोना उपचारात हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही