डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्यामध्ये 29 अब्ज डॉलर्सचा व्यवहार; अमेरिकेच्या ‘स्क्वेअर’कडे ‘आफ्टरपे’चा ताबा


न्यूयॉर्क : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील दोन महाबलाढ्य कंपन्या एकत्र आल्या असून अमेरिकन पेमेंट अॅप असलेली ‘स्क्वेअर’ आता ऑस्ट्रेलियन ‘आफ्टरपे’ या जगप्रसिद्ध कंपनीचा ताबा घेणार आहे. हा व्यवहार तब्बल 29 अब्ज डॉलर एवढ्या मोठ्या किंमतीला झाला असून याची घोषणा ‘स्क्वेअर’चा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जॅक डॉर्सीने केली आहे. ‘स्केअर’ आणि ‘आफ्टरपे’चे ध्येय समान असून या पुढील वाटचाल एकत्रित असल्याचे जॅक डॉर्सीने स्पष्ट केलं. बँकाच्या क्रेडीट कार्डला पर्याय देण्याची योजना ‘स्केअर’ कडून आखण्यात आली असून हा व्यवहार त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येते.

ग्राहकांना ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या ‘आफ्टरपे’ कडून देण्यात येते. त्यामुळे ग्राहक, लहान उद्योग त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करु शकतात. नंतर इन्स्टॉलमेंटमध्ये त्याची किंमत चुकवता येते. आता ही सेवा आफ्टरपेच्या अॅपवरही सुरु होणार असल्यामुळे अमेरिकेतील लाखो ग्राहकांना आणि लहान उद्योगांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतील. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या वस्तुंच्या ईएमआयवर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

स्क्वेअरच्या आणि आफ्टरपेच्या या व्यवहारामुळे आता आफ्टरपे अॅपला आपल्या व्यवसाय ऑस्ट्रेलियातही सुरु करता येणार आहे. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया या देशात स्क्वेअरचे ग्राहक सर्वाधिक आहेत. सध्या सात कोटीहून जास्त स्क्वेअर पेमेंट अॅपचे ग्राहक आहेत. कोरोना काळात ग्राहकांकडून कॅश-फ्री खरेदीसाठी स्क्वेअर पेमेंट अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. या कंपनीकडून आता लहान उद्योगांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या आफ्टरपेचे जगभरात 1.60 कोटी ग्राहक असून जवळपास एक लाख लहान उद्योगही यामध्ये सामिल आहेत. आफ्टरपे आणि स्क्वेअरमध्ये झालेल्या या व्यवहारानुसार आफ्टरपेचे संस्थापक अॅन्थोनी आयसेन आणि निक मोलनार हे दोघेही आता स्क्वेअरमध्ये सामिल होतील. तसेच स्क्वेअरच्या संचालक मंडळामध्ये आफ्टरपेच्या एका संचालकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे.