राजपुत्र अमित राजकारणाच्या आखाड्यात उतरणार, मिळाले स्पष्ट संकेत

देशात राजकारणात क्षेत्रातील काही घराणी प्रसिद्ध असून या घराण्यातील पुढच्या पिढ्या सुद्धा याच क्षेत्रात सक्रीय आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंब हे त्यापैकीच एक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे राजकारणाच्या आखाड्यात उतरत असल्याचे स्पष्ट संकेत दिले गेले असून त्यांची मुख्य स्पर्धा शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी असेल अशी चर्चा सुरु आहे.

पुढच्या वर्षी महाराष्ट्रात होणारया पंचायत, जिल्हा निवडणुकात अमित ठाकरे मनसेचे काम सांभाळणार असल्याचे समजते. नाशिक मध्ये सुरु झालेल्या मनसेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी अमित मैदानात उतरले आहेत. त्यांनी मनसेचे सदस्यत्व गेल्याच वर्षी घेतले आहे. तोपर्यंत ते राजकारणात सक्रीय नव्हते. पण गेल्या काही दिवसात त्यांनी विद्यार्थी, आंगणवाडी महिला कर्मचारी यांच्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळविल्या आहेत तसेच अन्य एका पत्रात शाळा फी संदर्भात विद्यार्थ्यांना त्रस्त करणाऱ्या शाळांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वडील राज यांच्याप्रमाणेच अमित हेही स्केचेस काढतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जात होते पण बाळासाहेबांनी उत्तराधिकारी म्हणून उद्धव यांची निवड केल्यावर राज यांनी २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे सध्या पर्यावरण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अमित ठाकरे आदित्य यांनाच टक्कर देतील असे संकेत दिले गेले आहेत. अमित यांनी प्रामुख्याने युवा वर्गाचे प्रश्न पुढे नेण्याचा निर्धार केला आहे असेही समजते.