युएफओ म्हणजे एलियन्सचे ड्रोन- युएफओ तज्ञ प्रोफेसरचा दावा

अमेरिकेच्या पेंटागॉनचा युएफओ रिपोर्ट जगभरात खळबळ माजविणारा ठरला असतानाच प्रसिद्ध  हॉवर्ड विद्यापीठातील युएफओ तज्ञ प्रोफेसर अवि लोएब यांनी युएफओ म्हणजे एलियन्सची ड्रोन असल्याचा दावा केला आहे. प्रो. लोएब म्हणतात, दुसऱ्या ग्रहांवर पृथ्वीपेक्षाही प्राचीन संस्कृती अस्तित्वात आहेत आणि एलियन्स ड्रोनच्या सहाय्याने पृथ्वीवर नजर ठेऊन आहेत. आपण ज्या युएफओ म्हणतो त्या प्रत्यक्षात एलियन्सची ड्रोन आहेत. कदाचित त्याला आर्टिफीशीयल इंटेलिजन्स म्हणजे एआय तंत्रज्ञानाची जोड दिलेली असू शकते. प्रोफेसर लोएब यांचा दावा पूर्णपणे नाकारला गेलेला नाही हे विशेष.

लोएब यांचा हा दावा खरा मानला तर ब्रह्मांडात पृथ्वी शिवाय अन्य ग्रहांवर जीवन आहे हे मान्य करावे लागते. प्रो लोएब सध्या एलियन्स कुठे आणि कसे उत्पन्न झाले असावेत यावर संशोधन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीजवळ येत असलेले क्षुद्र ग्रह किंवा उल्का हा एलियन्सनी टाकलेला कचरा आहे. प्रो लोयेब यांनी ‘द सन’ ला दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मांडात आपल्या सूर्यापेक्षाही प्राचीन सूर्य आहेत आणि ते अब्जावधी वर्षे जुने आहेत. त्यामुळे आपल्या सूर्यमालेत जसे पृथ्वीवर जीवन आहे तसे या प्राचीन सूर्यमालेतील ग्रहांवर असणे अशक्य नाही.

कदाचित या प्राचीन सूर्यमालेतील जीवन असलेल्या ग्रहावरील संस्कृती आपल्यापेक्षा अधिक प्रगत आहेत. कारण त्यांना अस्तित्वात येऊन जास्त काळ लोटला आहे असाही लोएब यांचा दावा आहे. काहीच दिवसापूर्वी अन्य एका प्रोफेसरने एलियन्स इतके अॅडव्हान्स्ड आहेत, त्यांचे तंत्रज्ञान इतके पुढारलेले आहे की पृथ्वीला ते अक्रोडाप्रमाणे सहज फोडू शकतील असाही दावा केला आहे.