पुणे जिल्ह्यात आढळलेला झिका आजाराचा पहिला रुग्ण झाला पूर्णपणे बरा


मुंबई : पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

३१ जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत सूचना दिल्या.