यंदाच्या वर्षी विराजमान होणार लालबागचा राजा….; पण घरातूनच घ्यावे लागणार दर्शन


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यातच आता राज्य सरकारने गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे. यापार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशभक्तासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना यंदाही लालबागच्या राजाचे दर्शन घरातूनच घ्यावे लागणार आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटातच गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही गणेश मंडळाने भाविकाच्या आरोग्याचा विचार करून ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.