वाळवंटातील जहाज उंटाविषयी थोडे काही


वाळवंटी भागात आजही उंट हे वाहतुकीचे मुख्य साधन आहे. अरब देशात तसेच भारतातील राजस्थान राज्यात उंट गाई म्हशीप्रमाणे पाळीव प्राणी म्हणून पाळले जातात. वाळूतून दीर्घ काळ न थकता प्रवास करू शकणारा आणि पाण्याची फारशी गरज नसलेला हा प्राणी वाळवंटी भागातील रहिवाश्यांना जवळचा मित्र वाटला तर त्यात नवल काय?

उंटाच्या पायाला असलेल्या बोटातील एक मोठे असते आणि त्यामुळे वाळूत सुद्धा त्याच्या पायाची पकड घट्ट असते. उंट जेव्हा खातो तेव्हा त्याचे खाद्य पोटातील पिशवीत जाते तेथे ते नरम होते आणि मग हे खाद्य पुन्हा तोंडात आणून उंट रवंथ करतो. गाई म्हशी सुद्धा असे रवंथ करतात. तो २० दिवा पाणी न पिता राहू शकतो. मात्र दीर्घ प्रवासाला जाताना किंवा त्याला पाणी पाजले कि एकावेळी तो १०० लिटर पेक्षा जास्त पाणी पितो. विशेष म्हणजे उंटाला एकदा रस्ता समजला कि मालक नसतानाही तो न चुकता मार्गक्रमणा करू शकतो.


उंटाचे डोळे आणि नाकपुड्या यावर लांब केस असतात त्यामुळे वाळू डोळ्यात वा नाकात जाण्यापासून त्याला संरक्षण मिळते. उंट खांद्यापर्यंत किमान ६ फुट उंच असतो आणि त्याचे वजन साधारण ११०० पौंड असते. मादीचा गर्भधारणेचा काळ ३७० ते ४२० दिवसांचा असतो. उंटीणीचे दुध अतिशय पौष्टिक असते. उंटाच्या शरीरातील पाणी २५ टक्के कमी झाले तरी त्याला त्याचा त्रास होत नाही मात्र माणसाच्या शरीरातील पाणी १२ टक्क्यांनी कमी झाले तरी माणसाची प्रकृती चिंताजनक होऊ शकते.

उंटाच्या काही सवयी विचित्र असतात. तो कुत्र्याप्रमाणे चावा घेतो. उंट दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात त्यांच्या पाठीवरचे कुबड किंवा उंचवटा म्हणजे मदार एकच असते तर काही उंटामध्ये दोन मदारी असतात. अरेबियन उंट हे पूर्ण पाळीव प्राणी असून त्याच्या पाठीवर एकाच मदार असते. गोबीचे वाळवंट तसेच लदाखच्या नुब्रा व्हॅलीमध्ये दोन मदारी असलेले उंट आढळतात.

Leave a Comment