टोकियो – भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला 4-3 ने नमवत आपले आव्हान कायम ठेवले आहे. भारताच्या वंदना कटारियाने शानदार खेळी करत गोलची हॅटट्रिक करण्याचा विक्रम केला. याआधीच्या सामन्यात शुक्रवारी भारताने आयर्लंडला हरवले होते. भारतीय महिला हॉकी टीमच्या या विजयासह क्वार्टर फायनलच्या आशा जीवंत आहेत. मात्र आता भारताला आज सायंकाळच्या सामन्यात आयर्लंडच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे.
Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय
सामन्याची भारतीय महिला हॉकी संघाने चांगली सुरुवात करत पहिल्या काही मिनिटातच गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात दक्षिण आफ्रिकेने एक गोल करत बरोबरी केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा एक गोल करत आघाडी घेतली. पण शेवटच्या क्षणात पुन्हा दक्षिण आफ्रिकेने गोल करत बरोबरी केली. त्यानंतर भारतीय संघाने पुन्हा तिसरा गोल करत आघाडी घेतली, पण याच क्वार्टरमध्ये आफ्रिकेने एक गोल करत पुन्हा 3-3 अशी बरोबरी केली. मात्र शेवटच्या क्वार्टरमध्ये वंदनाने आपला तिसरा आणि संघाचा चौथा गोल करत आघाडी मिळवून दिली. दरम्यान भारतीय महिला संघाकडून वंदना कटारियाने आज एक नवा विक्रम केला. ऑलिम्पिकमध्ये गोलची गोलची हॅटट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.