मिझोरममध्ये आसामचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल


एजवाल : आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सुरु असलेला सीमावाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. आसाम पोलिसांनी काल घेतलेल्या अॅक्शनला मिझोरम पोलिसांनीही जशास तसे उत्तर दिले असून मिझोरममध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, राज्यातील चार वरिष्ठ अधिकारी आणि अन्य लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिझोरमच्या कोलसिब जिल्ह्यात झालेल्या हिंसेवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक जॉन एन. यांनी सांगितले की आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबतच इतरांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि हिंसक कृत्यात सामिल असल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये आसामच्या 200 हून अधिक अज्ञात पोलिसांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

आसामच्या पोलिसांनी मिझोरम पोलिसांच्या या कारवाई आधी मिझोरमच्या कोलसिब जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना आसामच्या धोलाई पोलीस ठाण्यात सोमवारी हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे.