राजकारणातून भाजप खासदार बाबुल सुप्रियोंचा संन्यास!


नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील भाजप खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. ते आसनसोल मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेलेले आहेत.

राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा करताना बाबुल सुप्रियो यांनी म्हटले की, गुडबाय…. मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाही, टीएमसी, काँग्रेस, सीपीआय(एम) कोणीही मला बोलावलेले नाही, मी कुठेही जाणार नाही. समाजकार्य करण्यासाठी राजकारणातच असणे गरजेचे नाही.

बाबुल सुप्रियो मंत्रिपदावरून हटवण्यात आल्यापासून काहीसे शांत होते. शिवाय, ते थोडे अलिप्त देखील राहात असल्यामुळे ते राजकीय संन्यास घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले.