स्टीव्ह जॉब्सच्या नोकरीसाठीच्या अर्जाचा लिलाव, अडीच कोटी मिळाली किंमत

जायंट टेक कंपनी अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. त्याच्यावर अनेक पुस्तके बाजारात आलेली आहेत. त्यामुळे जॉब्ससंबंधी खूप माहिती उपलब्ध आहे. पण तरीही फार थोड्या लोकांना असलेली माहिती अशी की १९७३ मध्ये स्टीव्हने नोकरी मिळविण्यासाठी स्वहस्ताक्षरात अर्ज केला होता आणि हा त्याचा पहिलाच आणि शेवटचा अर्ज होता. त्यावेळी स्टीव्ह १८ वर्षांचा होता.

या अर्जाचा नुकताच लिलाव करण्यात आला असून त्याला २.५ कोटी रुपये म्हणजे ३,४३,०० डॉलर्स किंमत मिळाली आहे. हा अर्ज स्वहस्ताक्षरात असून त्यात जॉब्सने त्याच्याकडे वाहन चालक परवाना असल्याचे लिहिले आहे. पण त्यावेळी त्याच्याकडे फोन नव्हता त्यामुळे फोन नंबर दिलेला नाही. आत्मसात कौशल्ये म्हणून जॉब्सने संगणक आणि कॅलक्यूलेटरचे ज्ञान असल्याचे शिवाय डिझायनिंग, टेक्नोलॉजी मध्ये रस असल्याचे म्हटले आहे.

या अर्जाचा पहिला लिलाव २०१७ मध्ये झाला होता. त्यानंतर हा अर्ज वेबसाईटवर अपलोड केला गेला. हा अर्ज मार्च २०२१ मध्ये १.७ कोटी रुपयांना लिलावात विकला गेला होता आणि नुकत्याच झालेल्या लिलावात त्याला २.५ कोटींची बोली लागली.