श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या आणखी दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण


कोलंबो – श्रीलंका दौऱ्यावर असेलेले भारतीय क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्याला कोरोना झाल्यानंतर कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळांडूना क्वारंटाइन करण्यात आले होते. शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या.

काल गुरुवारी झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारत ७ गडी राखून पराभूत झाला. अशा प्रकारे श्रीलंकेने ही टी-२० मालिका २-१ने जिंकली. दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू मालिकेबाहेर गेले.

ईसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम पॉझिटिव्ह आढळले आहेत. नवीन चाचणीनंतर हो दोघे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौथम, मनीष पांडे, इशान किशन, यजुर्वेंद्र चहल हे खेळाडू कृणालच्या संपर्कात आले होते. टीम इंडिया आज श्रीलंकेहून घरी परतणार आहे. हार्दिक, पृथ्वी, सूर्यकुमार, मनीष, दीपक चहर आणि इशान किशन या खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ते संघासह भारतात परततील.

श्रीलंका सरकारच्या प्रोटोकॉलनुसार, जो खेळाडू पॉझिटिव्ह येईल. त्याला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. यानंतर, ते निगेटिव्ह चाचणीनंतरच देश सोडू शकतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला ७ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागते. चहल आणि गौथम यांच्या चाचणीचा निकाल आज शुक्रवारीच आला आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुढील १० दिवस श्रीलंकेत राहावे लागेल.