मुंबई – राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणी अटकेनंतर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मीडियावर आगपाखड करण्यास सुरूवात केली आहे. आपल्याविरोधात बदनामीकारक, आणि तथ्यहिन व्रृत्ते सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांवर छापण्यात येणा-या वृत्तांवर अंकुश लावण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
चुकीच्या बातम्यांमुळे झालेल्या मानहानीबद्दल शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव
दररोज यासंदर्भात मीडिया आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या आधारहिन आणि बदनामीकारक बातम्यांना मनाई करण्याची मागणी करणारा एक अर्ज शिल्पाच्यावतीने न्यायालयात सादर केला गेला आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह काही वेब चॅनल आणि वर्तमानपत्रांनाही प्रतिवादी केले गेले आहे.
अनेक माध्यमे राज कुंद्राच्या अटकेनंतर कोणतीही खातरजमा न करता माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबियांबाबत वाट्टेल त्या बातम्या प्रसिद्ध करीत आहेत. यामध्ये माझी प्रतिष्ठा आणि चारित्र्यहनन होत असून माझ्या व्यावसायिक, कौटुंबिक आणि सामाजिक सन्मानाचा भंग केला जात असल्याचा आरोप या याचिकेतून केला गेला आहे.
त्यामुळे या मानहानी करणाऱ्या वृत्तांकनावर अंकुश लावावा, असे कंटेंट देणा-या माध्यमांकडून 25 कोटींची नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणीही तिने केली आहे. तिने या अर्जात काही विशिष्ट वेबचॅनल आणि वर्तमानपत्रांचा उल्लेख केला आहे. तसेच अश्या वृत्तांमुळे याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात देखील बाधा येऊ शकते, असेही या अर्जात म्हटले आहे.
माझ्याशी या प्रकरणाचा संबंध जोडल्याच्या आधारहिन वृत्तांमुळे आपले व्यावसायिक नुकसान झाल्यामुळे आपली प्रतिमाही डागाळली जात आहे. त्यामुळे राज्य घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार आपल्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण केले जात असल्यामुळे अशा प्रसिद्धी माध्यमांना यावर मजकूर प्रसिद्ध करण्यावर मनाई करावी, अशी मागणी शिल्पा शेट्टीने केली आहे. यावर आज तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे.