कोरोना निर्बंधात शिथिलतेसाठी पुणेकरांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार


पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणात असला तरी तो खाली न आल्यामुळे जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध जैसे थे ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. दरम्यान पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना शुक्रवारच्या बैठकीत देण्यात आल्या.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर माई ढोरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये कोरोना विषयक परिस्थितीचे सादरीकरण करण्यात येऊन आढावा घेण्यात आला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेऊन मनुष्यबळ वाढवा. औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेऊन कामगार विभागाशी चर्चा करुन कामगारांना वेळेत लसीकरण करण्यासाठी कक्ष स्थापन करा. लसीकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या शासनाच्या सूचनांचे पालन करा. कोरोनाच्या मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना दिल्या. तसेच निर्बंध कमी करण्यासंदर्भात दुकानांच्या वेळा वाढवण्याबद्दल मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.