नाशिक करन्सी नोट प्रेसबाबत काही रोचक माहिती

नाशिक येथील करन्सी नोट प्रेस फेब्रुवारीत एका बातमीमुळे विशेष चर्चेत आले होते. या प्रेस मधून ५ लाख नोटा गायब झाल्याची आणि त्याचा तपास पोलीस करत असल्याची ही बातमी होती. त्या संदर्भात आता असा खुलासा झाला आहे की पंचिंग प्रोसेस चुकीमुळे हे घडले होते. सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटींग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या अखत्यारीत देशभरातील असे नऊ विभाग असून त्यात या प्रेसचा समावेश होतो.

नाशिक येथे त्यातील दोन विभाग आहेत. एकात करन्सी नोट म्हणजे चलनी नोटांची छपाई होते तर दुसऱ्या ठिकाणी मुद्रांक, रेव्हेन्यू तिकीट, पासपोर्ट, व्हिसा यांची छपाई होते. या दोन्ही ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षा असून आत जाताना किंवा बाहेर पडताना अनेक स्तरावर तपासणी केली जाते.

ब्रिटीश शासन काळात १९२८ मध्ये प्रथम नोटा छापण्याच्या मशीनचा वापर येथे केला गेला. येथेच देशाचे चलन छपाई केली जाते आणि हाय क्वालिटीच्या नोटा छापल्या जातात. एके काळी येथे नेपाळ, भूतान, बांग्लादेश, पूर्व आफ्रिका, इराक याच्याही चलनी नोटा छापल्या जात होत्या.

१४ एकर परिसरात हा प्रेस पसरलेला असून आतच कर्मचारी निवास सुविधा आहे. जीवनावश्यक साऱ्या वस्तू आतच उपलब्ध होतात. येथे डिझाईन, इनग्रेव्हिंग, प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग अशी सर्व कामे मशीनच्या सहाय्यानेच होतात. येथेच नंबरिंग आणि फिनिशिंग सुद्धा होते. नोट छपाई बनावट नोटा सहजी बनविता येऊ नयेत यासाठी अतिशय क्लिष्ट पद्दतीने केली जाते. त्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जातो.

नोटबंदी नंतर नव्या सर्व नोटा येथेच छापल्या गेल्या आणि एका दिवसात ४ कोटी नोटांची छपाई करण्याचा विक्रम केला गेला त्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक वेळ काम केले. येथे ५००,२००,१००,५०,२०,१० रुपये मूल्याच्या नोटा छापल्या जातात. २००० रुपये मूल्याच्या नोटेची छपाई मैसूर आणि प.बंगाल मधील सालबोनी येथे होते. नासिक प्रेस मध्ये सध्या २५४७ कर्मचारी असून हा सर्व परिसर हाय सिक्युरिटी झोन मध्ये आहे. येथे सेंट्रल इंटेलिजन्स फोर्सचे जवान तैनात आहेत.