टाटा मोटर्सची ही इलेक्ट्रिक कार फुल चार्ज मध्ये ५०० किमी धावणार

भारतात इलेक्ट्रिक वाहनांना सरकारकडून प्रोत्साहन आणि काही सवलती दिल्या जात असून पेट्रोल डिझेलचे वाढते दर ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करू लागले आहेत. देशातील बडी वाहन उद्योग कंपनी टाटा मोटर्सने मध्यमवर्गीयांना परवडेल अश्या किमतीत त्यांची प्रीमियम हचबॅक अल्ट्रोझचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच बाजारात येत असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे ही कार एका फुल चार्ज मध्ये ५०० किमीचे अंतर कापेल असे समजते.

एएलएफए प्लॅटफॉर्मवर तयार होणारी कंपनीची ही पहिली कार असेल असे सांगितले जात आहे. ड्रायव्हिंग रेंज मुळे ही कार अधिक चर्चेत आली आहे. या कारसाठी झिपट्रोन इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा वापर केला गेला आहे. कार मध्ये अॅडीशनल बॅटरी पॅकचा ऑप्शन दिला जात असून त्यामुळे २५ ते ४० टक्के जादा ड्रायविंग रेंज मिळणार आहे. म्हणजे एका फुल चार्ज मध्ये ५०० किमीची रेंज मिळणार आहे असे समजते.

या कारसाठी ३०.२ केडब्ल्यूएच लिथियम आयन लिक्विड कुल बॅटरी पॅक दिला जात असल्याचे सांगितले जात असले तरी कंपनीने त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. टाटाची नेक्सोन इव्ही फुल चार्ज मध्ये ३१२ किमी अंतर कापते. नव्या अल्ट्रोजच्या किमतीबाबत खुलासा झालेला नसला तरी ही कार १० ते १२ लाख या रेंज मध्ये मिळेल असे संकेत दिले गेले आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या एफएएमआय दोन योजनेचा फायदा या कारला मिळू शकणार आहे.