हजारो मैलांचा प्रवास करतात ही फुलपाखरे

पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून दरवर्षी स्थलांतर करतात हे आपल्या परिचयाचे आहे. पण केवळ पक्षीच नाही तर काही फुलपाखरे सुद्धा असा हजारो मैलांचा प्रवास करून एका खंडातून दुसऱ्या खंडात जातात हे आता संशोधनातून उघड झाले आहे. फुलपाखरांच्या या स्थलांतराने संशोधन चकित झाले आहेतच पण त्यातून निर्माण होणारा धोकाही त्यामुळे लक्षात आला आहे.

पेंटेड लेडी या प्रजातीची फुलपाखरे उपसहारा आफ्रिका खंडातून पूर्ण सहारा वाळवंट पार करून युरोपात येतात. हा प्रवास १२ ते १४ हजार किमीचा असून फुलपाखरू प्रजातीसाठी हा सर्वात दीर्घ अंतराचा प्रवास ठरला आहे. आफ्रिकी थंडी व उत्तर आफ्रिकी वसंत ऋतू मध्ये वाढलेल्या वनस्पती, अनुकूल हवा या फुलपाखरांच्या या प्रवासाचे कारण बनली आहे. ही फुलपाखरे आफ्रिकेतील सवाना व सलोक भागात उबदार थंडीत वाढणाऱ्या झाडांची पाने खातात. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आणि अधिक अन्नासाठी ही फुलपाखरे सहारा पार करून उत्तर आफ्रिकेत पोहोचतात. तेथील उबदार थंडीत पुन्हा त्यांची संख्या वाढते आणि ती भूमध्य महासागर पार करून युरोपात येतात.

युरोपातील बगीच्यात ही सुंदर फुलपाखरे दिसली की पाहताना आनंद होतो पण फुलपाखराची ही जात आक्रमक आहे आणि ती अन्न धान्याचा फडशा पाडू शकते तसेच अनेक आजार पसरवू शकते हे आता संशोधकांच्या लक्षात आले आहे. प्रो. ऑलिव्हर यांच्या म्हणण्यानुसार संशोधनातून या फुलपाखराचा अन्य वेळी असंभव वाटणारा प्रवास संभव असल्याचे दिसून आले आहेच. त्यावरून आता मलेरिया पसरविणारे डास, प्लेग पसरविणाऱ्या पिसवा हे कीटक सुद्धा असे स्थलांतर करतात का याचा शोध घेतला जाणार आहे.

संशोधनात असे दिसून आले की ही फुलपाखरे दिवसभर प्रवास करतात, रात्री वाळवंटात आराम करतात. समुद्रसपाटी पासून १ ते ३ किमी उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा त्यांना फायदा मिळतो. शरीरातील फॅटचा वापर करून ही फुलपाखरे न थांबता ४० तास उडू शकतात.