या आहेत सर्वाधिक मुदतीच्या तुरुंगवास शिक्षा
एखाद्याने गुन्हा केला आणि तो गुन्हा सिध्द झाला तर बहुतेक देशात गुन्हेगारांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. हा कालावधी अगदी काही दिवस ते काही वर्षे असा असू शकतो. जन्मठेप म्हणजे १४ वर्षे तुरुंगवास. आपण कधी लाखो वर्षाची तुरुंगवास शिक्षा ऐकलेली नसते. पण अशाही शिक्षा जगात विविध देशात दिल्या गेल्या आहेत. अगदी त्याची नोंद गिनीज बुक मध्ये सुद्धा पाहायला मिळते. विशेष म्हणजे या शिक्षा अलीकडच्या काळात सुनावल्या गेलेल्या आहेत.
थायलंडच्या चामोए थीप्यासो नावाच्या एका महिलेला १९८९ मध्ये कोर्टाने १,४१,०७८ वर्षांची तुरुंगवास शिक्षा दिली आणि त्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली. पिरामिड स्कीम मध्ये या महिलेने १६२३१ लोकांची १९ कोटी रुपयांची फसवणूक केली म्हणून तिला ही शिक्षा दिली गेली. पण त्यानंतर पैसे फसवणुकीसाठी २० वर्षापेक्षा जास्त शिक्षा देता येणार नाही असा कायद्यात बदल झाला आणि ही महिला ८ वर्षात तुरुंगातून सुटली.
स्पेनच्या एका पोस्टमनला त्याने ४० हजार पत्रे आणि पार्सल वाटलीच नाहीत म्हणून प्रत्येक पत्र आणि पार्सल मागे ९ वर्षे अशी ३,८४,९१२ वर्षाची तुरुंगवास शिक्षा दिली गेली ती १९७२ साली. ग्रॅब्रीयल ग्रनादेस असे त्याचे नाव होते. नंतर ही शिक्षा १४ वर्षांवर आणली गेली. १९९४ मध्ये अॅलन वेन मॅकलॉटीन अनेक गुन्ह्यात दोषी ठरला तेव्हा त्याला २१२५० वर्षाची शिक्षा दिली गेली. चार रेप केस मध्ये ८ हजार वर्षे, चार अनैसर्गिक संबंध केस मध्ये ८ हजार वर्षे, शस्त्रहल्ला मध्ये १५०० वर्षे आणि लुटपाट बद्दल ५०० वर्षे अशी ही शिक्षा होती. त्याच्या साथीदाराला ११२५० वर्षांची शिक्षा दिली गेली होती.
तुर्कस्तानातील एक प्रबळ व्यक्ती अदनान ओक्तर याला सेक्स क्राईम बद्दल १०७५ वर्षांची शिक्षा दिली गेली असून तो जेल मध्ये आहे. विशेष म्हणजे पूर्वी तो धार्मिक पुस्तकांचे लेखन करत होता आणि त्याची अनेक पुस्तके जगभर प्रसिद्ध आहेत. त्याच्यावरील १० केस मध्ये १०७५ वर्षाची शिक्षा आहे तर अजून अन्य केसेसची सुनावणी सुरुच आहे.
अमेरिकेत दहशतवादी टेरी निकोल्स याला ओक्लहामा बंबिंग केस मध्ये ३० हजार वर्षांची शिक्षा झाली आहे तर याच शहरातील चार्ल्स रॉबिन्सन यालाही ३० हजार वर्षांची शिक्षा झाली आहे. पॅरोल न देता जन्मठेप शिक्षा देता येत नाही म्हणून त्याला इतकी शिक्षा दिली गेली आहे. तो तुरुंगातच असून १०८ वर्षाचा झाला की त्याला पहिला पॅरोल मिळू शकणार आहे. स्पेन मध्ये अल कायदाच्या तीन दहशतवाद्यांना १ लाख २० हजार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा २००४ मध्ये सुनावली गेली आहे.