Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा अर्जेंटीनावर दणदणीत विजय


टोकियो : अर्जेंटीनावर मात करत भारतीय पुरुष हॉकी संघाने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला आहे. अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला भारताने पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या अर्जेंटीनाला 3-1 अशा फरकाने पराभूत केले. अर्जेंटीनाचा पराभव केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या ग्रुपमधील टॉप 2 संघांमध्ये सहभागी झाला आहे. ग्रुप स्टेजवर शेवटचा सामना जपानसोबत 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

शेवटच्या क्वार्टरमध्ये भारत विरुद्ध अर्जेंटीनाच्या सामन्याचा थरार पाहायला मिळाला. अनेक चढ-उतार चौथ्या क्वार्टरमध्ये पाहायला मिळाले. पण सर्वात शेवटी भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर सामना खिशात घातला. सामन्यात भारताकडून वरुण कुमार, विवेक आणि हरमनने गोल डागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हरमनने आतापर्यंत 3 गोड डागले आहेत. भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलरहित राहिले. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक हॉकीच्या जोरावर अर्जेंटीनावर दबाव आणला होता.