Tokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार पदकापासून एक पाऊल दूर


टोकियो : टोकियो ऑलिम्पिकच्या सातव्या दिवशी भारताची दिमाखदार सुरुवात झाली. भारताच्या चार धुरंधरांनी पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. हॉकी, बॅडमिंटन, तीरंदाजीपाठोपाठ आता बॉक्सिंमध्येही भारताने बाजी मारली आहे. भारताचा स्टार बॉक्सर सतीश कुमारने 91 किलो वजनी गटाच्या शेवटच्या सामन्यात जमैकाच्या रिकार्डो ब्राउनचा 4-1 अशा फरकाने पराभव केला आहे. सतीश कुमार या विजयासह क्वार्टर फायनल्समध्ये दाखल झाला आहे.

सतीशने आजच्या विजयासह अंतिम 8 मध्ये प्रवेश केला आहे. पदकापासून सतीश केवळ एक पाऊल दूर आहे. सतीशने जमैकाच्या बॉक्सर विरोधात धमाकेदार खेळी करत क्वार्टर फायनलमध्ये स्थान पक्के केले. आपल्या दमदार पंचेसच्या जोरावर 5-0 अशा फरकाने पहिला राऊंड सतीशने आपल्या नावे केला. या राऊंडमध्ये पाचही पंचांनी सतीशला 10-10 अंक दिले.

सतीश कुमारने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्येही रिकार्डो ब्राउनवर दबाब कायम ठेवला. या सामन्यात रिकार्डोला वापसी करण्याची एकही संधी सतीशने दिली नाही. सतीशने दुसरा राउंड 4-1 च्या फरकाने जिंकला. तर तिसरा राऊंडही सतीशने 4-1 या फरकाने जिंकला. आता सतीश 91 किलो वजनी गटात पदक जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.