Tokyo Olympic; ‘सुपरमॉम’ मेरी कोमचा धक्कादायक पराभव


टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक जिंकण्याच्या भारताच्या आशांना गुरुवारी सुरुंग लागला. भारताची दिग्गज महिला बॉक्सर एमसी मेरीकोम हिचा धक्कादायक पराभव झाला. ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती कोलंबियन खेळाडू इंग्रिट वालेंसिया हिने 38 वर्षीय मेरी कोम हिला 3-2 असे पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला.

गुरुवारी कोलंबियाच्या इंग्रिट वालेंसिया हिच्याशी सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कॉम हिचा सामना झाला. प्रतिस्पर्धी खेळाडूकडून पहिल्या राउंडमध्ये 1-4 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये मेरी कोम हिने जोरदार पुनरागमन करत 3-2 असा विजय मिळवला. पण निर्णायक तिसऱ्या राउंडमध्ये वालेंसिया हिने मेरी कोम हिच्यावर ‘पंच’चा पाऊस पाडत 3-2 असा विजय मिळवला.

पंचांनी वालेंसिया हिला विजयी घोषित केल्यानंतर मेरी कोम हिच्यासोबत कोट्यवधी भारतीयांचे डोळेही पाणावले. पण हा पराभवही खिलाडूवृत्तीने स्वीकारत एकीकडे डोळ्यात पाणी तर दुसरीकडे चेहऱ्यावर हसू, असे मेरी कोम हिचे रुप रिंगमध्ये पाहायला मिळाले.